Published On: Sat, Nov 16th, 2013 5:21 am

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे हृदयविकाराने निधन

sudhir bhattमुंबई : ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.
गेली २५ वर्षे सुयोग नाट्यसंस्थेच्या माध्यमातून एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरूची मावशी अशी एकाहून एक वरचढ आणि विक्रमी नाटके त्यांनी सादर केली होती. सुयोग नावाची नाट्यसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
सुधीर भट हे तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे वादग्रस्त निर्माता म्हणून चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक प्रचंड चालले. पण पुढची बरीच नाटके ओळीने आपटली. पुन्हा ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘हसत खेळत’ ही नाटके चालली, ‘गांधी विरुद्ध गांधी’ यासारख्या महत्त्वाच्या नाटकाने व्यवसायात मात्र खोट दिली. पुन्हा ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांनी उसळी घेतली.
देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना युरोप, अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला.
शनिवारी दुपारी शिवाजी पार्कमध्ये सुधीर भट यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आला आहे.

About the Author